मान्सुनपुर्व आढावा सभेत जिल्हाधिकारी यांचे नगरपरिषद अधिकाऱ्यांना निर्देश यवतमाळ : पाऊस सुरू झाला तरी अद्याप मान्सुनपुर्व नाले स्वच्छतेची का...
मान्सुनपुर्व आढावा सभेत जिल्हाधिकारी यांचे नगरपरिषद अधिकाऱ्यांना निर्देश
यवतमाळ : पाऊस सुरू झाला तरी अद्याप मान्सुनपुर्व नाले स्वच्छतेची कामे पुर्णपणे झाली नाही, नाले साफसफाई हे नियमित काम असल्याने ते लवकर का सुरू केले नाही, याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांना त्रास होऊ न देता शहरातील स्वच्छतेची कामे नियोजनपुर्वक व तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.
मान्सुनपुर्व कामे व घनकचरा संकलन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्याधीकारी महेश जामनोर प्रामुख्याने उपस्थित होते.
पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पाणी तुंबून नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, नागरिकांची कोणत्याही स्वरूपात जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी यवतमाळ शहरातील चार मोठे नाले व त्याचेशी संबंधीत साफसफाईची कामे उद्यापासूनच सुरू करण्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
तसेच घनकचरा संकलनाबाबत देखील त्यांनी आढावा घेतला. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सर्व बाजार पुर्णपणे सूरू झाल्याने कचऱ्यात वाढ होणार असली तरी नगरपालीकेने प्रत्येक घरी, प्रतिष्ठाने व जागोजागी जाऊन कचरा संकलीत करावा, शहरात कोठेही कचऱ्याचे ढिग दिसायला नको, असेही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनेबाबत माहिती दिली. नाले साफसफाई व घनकचरा संकलनाच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून आरोग्य विभागाअंतर्गत करण्यात येणारी स्वच्छतेची कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले. बैठकीला नगरपरिषदेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
No comments