संग्रहित छायाचित्र उपविभागीय कृषी अधिकारी यांचे आवाहन यवतमाळ : बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची ...
संग्रहित छायाचित्र |
उपविभागीय कृषी अधिकारी यांचे आवाहन
यवतमाळ : बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावी व या व्यवहाराची रोख किंवा उधारीची पावती अवश्य घ्यावी.
पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्यांचे नाव असल्याची खात्री करून घ्यावी.
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन / पिशवी, टैग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे नमुन्यादाखल पिकाची कापणी होईपर्यंत सांभाळून ठेवावे. बियाण्यांची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची योग्य पाहणी करून बियाण्यांमध्ये भेसळ नसल्याची खात्री करून घ्यावी.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहून घ्यावी. बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
शेतकऱ्याने बियाण्याच्या तक्रारीबाबत विहीत नमुन्यात संबंधीत तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावा.
शेतकऱ्याने कमी अंकुरणाबाबतची तक्रार पेरणी केल्यापासून दहा दिवसांचे आत कृषी विभागाकडे दाखल करावी, बियाणे उत्पादकाने केलेल्या दाव्याविरुध्द किड पडण्याच्या व रोग होण्याच्या शक्यतेसंबंधीची तक्रार अशी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ दाखल करावी.
जनुकीय अशुध्दतेच्या बाबतीतील तक्रार पीक पन्नास टक्के फुलोरा अवस्थेत आल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत किंवा योग्य टप्यावर दाखल करावी आणि अनुकूलन अक्षमतेच्या बाबतीतील तक्रार, पिकाच्या योग्य टप्प्याला दाखल करावी.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.
No comments