हत्याकांडात १० जणांविरोधात गुन्हा दाखल यवतमाळ : यवतमाळ येथील स्टेट बँक चौकात अनोळखी व्यक्तीनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला अस...
हत्याकांडात १० जणांविरोधात गुन्हा दाखल
यवतमाळ : यवतमाळ येथील स्टेट बँक चौकात अनोळखी व्यक्तीनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना २३ जुनला रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान घडली.
करण परोपटे (२६) रा.चांदोरे नगर असे मूताचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळातील एका गुन्हेगारी टोळीचा संबंध असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मृताची पत्नी आभा करण परोपटे (२७) हिने शहर पोलिसांत स्वत:च्या भावासह दहा जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी सर्व १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड अक्षय राठोड आहे. तो सध्या एमपीडीए कायद्यांतर्गत औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध आहे. त्याने कारागृहातूनच या हत्याकांडाची सूत्रे हलवल्याचा संशय आहे.
आरोपींमध्ये अक्षय आत्मारात राठोड (३२), आशिष उर्फ बगिरा दांडेकर (३०), शुभम बघेल (२५), धीरज उर्फ बंड (२५), गौरव गजबे (३०), प्रवीण उर्फ पिके केराम (२८) सर्व रा. यवतमाळ, दिनेश तुरकाने (२५) रा. बाभूळगाव, कल्या उर्फ नितेश मडावी (२८), दिलीप ठवकर (३०), अर्जून भांजा (२७) तिघेही रा. दिघोरी नाका, नागपूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
याबाबतची मृतकाची पत्नी आभा करण परोपटे (२७) रा. राणी अमरावती ता. बाभूळगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तिचा पती करण परोपटे याची बुधवारी रात्री बंदुकीच्या चार गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
मृत करण हा औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध असलेल्या अक्षय राठोडचा जावई आहे. फिर्यादी आभा ही अक्षयची लहान बहीण आहे. मृत रेतीचा व्यवसाय करीत होता. त्यातील व्यवहाराच्या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना तसेच मृताच्या कुटुंबियांना आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका विनयभंगाच्या घटनेची किनारही या हत्याकांडामागे असावा, असा पोलिसांना संशय आहे.
घटनास्थळी आशिष उर्फ बगिरा, शुभम बघेल आणि अन्य एक जण होता, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली. तर मृतकाच्या पत्नीने या हत्याकांडात थेट स्वत:चा मोठा भाऊ कुख्यात गुंड अक्षय राठोडच्या विरोधात पतीच्या खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे आणि जातिवाचक शिवीगाळ करणे आदी आरोप करून तक्रार केल्याने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
पोलिसांनी अक्षयला मुख्य आरोपी तर अन्य नऊ जणांविरोधात सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप जाहीर केली नाही. या प्रकरणाच्या तपासावर पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, हे स्वत: लक्ष ठेवून आहेत, तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर या प्रकरणाचा तपास करीत आहेत
No comments