यवतमाळ : खरीप हंगामाच्या योग्य नियोजनासाठी पेरणीपूर्व मार्गदर्शन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे मार्फत शेतकरी ...
यवतमाळ : खरीप हंगामाच्या योग्य नियोजनासाठी पेरणीपूर्व मार्गदर्शन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे मार्फत शेतकरी मार्गदर्शन मोहीम राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून बाभुळगाव तालुक्यातील वाटखेड येथे आत्मा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी बाभुळगाव यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सभा घेण्यात आली.
या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:कडे राखून ठेवलेले बियाणे वापर, बियाणे उगवण क्षमता चाचणी, पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया, रूंद सरी वरंबा पध्दत. बियाणे खरेदी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.
सोयाबिन पिकामध्ये दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नसल्यामुळे घरचे बियाणे वापरताना उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा जास्त असल्यास हेक्टरी 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवण कमी असल्यास त्याच प्रमाणात जास्तीचे बियाणे पेरणीकरीता वापरावे.
बिजप्रक्रीया करताना रायझोबियम व पी.एस.बी या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रीया करताना 250 ग्रॅम प्रती 15 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रीया करावी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रीया करणेपूर्वी 3 ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे थायरम या बुरशी नाशकाची बीजप्रक्रीया करावी.
सोयाबीनची लागवड टोकन किंवा रुंद सरी वरंबा पध्दतीने केल्यास बियाण्याची 20 टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ होते. रासायनिक खतांचा वापर कमी करताना कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत म्हणून बोरू, धैचा, चवळी यासारखा पिकाचा वापर, निंबोळी अर्कचा वापर करणे फायद्याचे ठरते.
तसेच या सभेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणेसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रात गर्दी न करता शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पुरवठा या मोहिमेत सहभागी व्हावे, असे तालुका कृषी अधिकारी अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी सुरेश गावंडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गजानन घाटे, कृषी सहाय्यक श्री. नरवडे व शेतकरी उपस्थित होते.
No comments