पब्लिक पोस्ट यवतमाळ प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता जाणकार वर्तव...
पब्लिक पोस्ट
यवतमाळ
प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता जाणकार वर्तवत असताना सण उत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाने आखून दिलेले नियम नागरिकांकडून चक्क पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले. सोमवार ला पोळ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत नागरिकांची केलेली तोबा गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरु शकते असे जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपुर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळुन आला. सध्या कोरोनाचे रुग्ण आढळुन येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. विना मास्क फिरणारे आणि गर्दी करणारे नागरिक सर्वत्र दिसुन येतात. व्यावसायिकांकडुनही नियमांचे पालन होताना दिसत नाही. अशातच सोमवार दि. ६ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या निमित्ताने नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी केली. इंदिरा गांधी मार्केट, मुख्य बाजारपेठ, केदारेश्वर महादेव मंदिर परिसर या ठिकाणी नागरिकांची शेकडोंच्या संख्येने गर्दी झालेली दिसुन आली.
गेल्या वर्षी सण-उत्सवांचा कालावधी संपताच जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली होती.
तर कोरोना वाढल्याशिवाय राहणार नाही
जिल्ह्यात अद्यापही दरदिवशी कोरोनाचे नवे रुग्ण आढळुन येत आहेत. मध्यंतरी केलेल्या तपासणीत जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ३ रुग्ण आढळुन आले आहेत. अशा परिस्थितीत नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असतील तर कोरोनाचे रुग्ण वाढल्याशिवाय राहणार नाही. ही बाब लक्षात घेता सण-उत्सव काळात नागरिकांनी एकत्रीकरण टाळणे जीतके महत्वाचे आहे. तितकेच प्रशासनाच्या वतीने कठोर उपाययोजना करणेही महत्वाचे झाले आहे.
दुपारी पावसामुळे गर्दी झाली कमी
पोळ्याच्या दिवशी दुपारी शहरात काही काळ पाऊस बरसला. या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची भंबेरी उडाली होती. जोपर्यंत पाऊस सुरू होता तोपर्यंत बाजारपेठेत झालेली नागरिकांची गर्दी कमी झाली होती. मात्र पाऊस थांबल्यानंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी झाली होती. गर्दीमध्ये नियमांचा फज्जा उडाला .
बाजाराला नव्हती नगर पालिकेची परवानगी
दरवर्षी पोळ्याच्या निमित्ताने पाच कंदील चौक परिसरात भरणाऱ्या बाजाराला पालिका प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली नव्हती. असे असताना इंदिरा गांधी मार्केटमध्ये असलेल्या व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर स्टॉल लावलेले होते. या स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती.
प्रशासनाकडुन उपाययोजनाही नाही
शाहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. नागरिकांकडुन नियम देखील पाळण्यात येत नव्हते. असे असताना या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस, नगर पालिका किंवा महसुल प्रशासन यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.
" कोरोनाच्या नियमांना दिली जातेय तिलांजली
सोमवारी बाजारपेठेत तोबा गर्दी झालेली दिसुन आली. या गर्दीमध्ये तोंडाला मास्क लावणे, एकमेकांत अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे असे साधे नियम सुद्धा नागरिकांकडून पाळण्यात येत असलेले दिसुन आले नाही. बाजारपेठेत झालेली गर्दी पाहुन जिल्ह्यातून कोरोना संपला की, काय असे जाणवत होते."
No comments