बाभूळगाव: तालुका प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक शेत शिवारात व गावांमध्ये पाणी श...
बाभूळगाव:
तालुका प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक शेत शिवारात व गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे नुकसान, घरांची पडझड, नदीवरील पुल, रस्त्यांचे मोठे नुकसान दिसुन येत आहे. आज दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील आसेगाव, यावली, वाई हातोला परिसरातील नुकसानाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली. त्यांचे सोबत उपविभागीय अधिकारी अनिरूध्द बक्षी, तहसिलदार विठ्ठल कुमरे, निवासी नायब तहसिलदार योगिराज निवल, तलाठी, पोलिस पाटील उपस्थित होते.
आसेगाव देवि ते वाई हातोला दरम्यान शिरगुई नाल्यावर असलेला पुल खरडून गेला. या पुलाची सर्वप्रथम पाहणी करीत जिल्हाधिकारी यांनी पुलाच्या दुरूस्तीचे मनरेगा मार्फत रूंदीकरण व दुरूस्ती करण्याचे निर्देष स्थानिक प्रषासनाला दिले. त्यानंतर आसेगाव शिवारातील शेतांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर यावली रोडलगत असलेल्या पंकज जिचकार यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. संबंधित यंत्रणेला झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तर ज्या शेतक-यांनी ओफलायीन किवा ऑनलाईन पिक विमा काढला आहे त्यांनी पिकविम्याची प्रत पंचनाम्या सोबत देण्याबाबत उपस्थित कर्मचारी व शेतक-यांना सांगितले. यावली येथील नाल्यावर पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यु झाला होता, त्या घटनास्थळी जावुन जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी आसेगाव देवीचे सरपंच सचिन चव्हाण, भोपाळ लुनवात, तलाठी ढेकळे, गजानन कोळनकर, पंकज जिचकार, वैभव खोडे,संदीप लुनवात, गिरीश टप्पे आदी शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यात मुसळधार पावसामुळे आज पर्यंत 417 हेक्टर कापूस, 264 हेक्टर सोयाबीन, 13 हेक्टर वरील तूर पिकांचे नुकसान झाले आहे. पुरात वाहुन गेल्याने एक जिवीतहानी तर एक बैल वाहून गेला. 9 कच्चे बांधकाम असलेले घरांचे पुर्णतः पडझड झाली.अजुनही नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. धरण प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने बेंबळा नदी दुथडी वाहत असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
No comments