राजकीय अंकुश 9421424242 दैनिक पब्लिक पोस्ट यवतमाळ जिल्ह्याला राजकीय वैभवाची परंपरा आहे.गेल्या अनेक दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याच...
राजकीय अंकुश
9421424242
दैनिक पब्लिक पोस्ट
यवतमाळ जिल्ह्याला राजकीय वैभवाची परंपरा आहे.गेल्या अनेक दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये नेतृत्व नसल्याची पोकळी निर्माण झाली. एकेकाळी या जिल्ह्याने अकरा वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगलं त्या जिल्ह्याला लाल लाल दिव्याची अवकळा यावी यापेक्षा दुसरे कोणतेच दुर्दैव नाही. वास्तविक पाहता या जिल्ह्याला एकेकाळी पाच लाल दिव्याच्या गाड्या तैनात झाल्या होत्या,त्यावेळी मात्र जिल्ह्याला लाल दिव्याचं वैभव होत. आज यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे आहे याबाबत अनभिज्ञता आहे.
वास्तविक पाहता यवतमाळ जिल्ह्याला महा विकास आघाडीने पालकमंत्री म्हणून ना.भुमरे यांची निवड केली. खरंतर मराठवाड्यातील हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. ऊस तोड कामगार यापासून तर लाल दिव्याच्या मंत्रिपदाचा पर्यंतचा हा सक्रिय शिवसेनेचा कार्यकर्ता जरी असला तरी यवतमाळ जिल्हा त्यांच्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून अगदी नवीन आहे. त्यामुळे इथे असणारे शिवसेनेले दोन गट सुद्धा त्यांना एकत्रित करण्यामध्ये यश आले की नाही ते अजून पर्यंत यवतमाळ करांना माहित झाले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळतो, परंतु राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय तज्ञ आणि राजकीय धुरंदर म्हणून शरद पवार यांची ख्याती असताना अकरा वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगलेल्या जिल्ह्याला एकही लाल नसावा हे मात्र एक गूढ रहस्य कायम राहिले आहे.त्यामुळे किमान महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल ज्यांच्याकडे आहेत ते लक्ष देतील का हा यक्षप्रश्न सध्या जनतेसमोर निर्माण झाला आहे.
यवतमाळमध्ये विविध प्रकारच्या समस्या गेल्या एक वर्षापासून जास्त प्रमाणात जाणवायला लागल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी आपल्याला बोलणार नाही म्हणून सैराट अवस्थेमध्ये असताना दिसतात. त्यामुळे आता त्यांच्यावरती रिमोट कंट्रोल कोणी ठेवायचा हे मात्र कुणाच्याही लक्षात येत नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस अशा प्रकारचे नवे समीकरण निर्माण झाले आहे. परंतु आजही यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती इतकी गंभीर आहे की, शिवसेनेचे काँग्रेसचे पटत नाही आणि काँग्रेसचे राष्ट्रवादीशी पटत नाही. त्यामुळे विधानसभेवरती जरी भगवा फडकला असला तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र या महाविकास आघाडीचे तीन शकलं मात्र सातत्याने दिसून येतात. तळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची तळमळ सातत्याने सुरू असते. नगरसेवकापासून तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांपर्यंत आपापल्या पद्धतीने काम करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. परंतु याला शेवटी न्याय कोण देणार हे मात्र कळायला मार्ग नाही.जिल्ह्यामध्ये पाऊस आला पण प्रमाणात काही भागांमध्ये मात्र तेवढीच गंभीर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत झाली नाही. बुडीत क्षेत्रात गेली पिके व त्यांची मदत सुद्धा अत्यल्प झाली. बळीराजा मात्र बेवारस झाला आहे. दुसरीकडे बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून हळूहळू शहरापासून तर तालुक्यात पर्यंत ची गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे. विशेषता केंद्र आणि राज्य सरकारच्या असणाऱ्या जनहितार्थ योजनांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र आपले ओले हात," मी नाही त्यातली कडी लाव आतली!"ही भूमिका सातत्याने ठेवली आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच कारभार पाहायला मिळतो. शेवटी कोण कुणाचा वाली आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टीकोनातून विचार करतो म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आज कुठेही उदयास आलेले दिसत नाही,फक्त आपल्याच नावाचा प्रचार करण्या मध्ये गुंग असणारी राजकीय फलक् लावून आणि राज्य पातळीवर आपल्या नेतृत्वाला मी मोठे काम करत आहोत असा गवगवा करणारे राजकीय पुढारी मात्र दिसून येत आहे. मात्र खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांच्या समस्या टिपताना कमी प्रमाणात दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची असणारी अनास्था एवढीच कायम असून जिल्ह्यातील कुठल्या गावांमध्ये आज काँग्रेसचे साधे फलकही दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस आहे कि नाही हे सुद्धा लक्षात येत नाही.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी शिवसेनेचे फलक गावागावांमध्ये भगव्याचा प्रचार केला जायचा आज मात्र ते सुद्धा कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे एकाकी झुंज देणाऱ्या नेतृत्वाला शेवटी आता भगवा खांद्यावर घेऊन लढावे लागत आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे असणारे आमदार व माजी वन मंत्री संजय राठोड यांचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन आपली असणारी प्राथमिक जबाबदारी पार पाडली परंतु मंत्रिपद गेल्यानंतर या संधीचा फायदा घेऊन आपणास काही करता येईल का या अनुषंगाने बरेच राजकीय मनसुबे सध्या नजरेसमोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. लोकसभा प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या खासदार भावनाताई गवळी या ईडीच्या चौकटीत सापडल्यामुळे त्यांनाही आता राजकीय दृष्टिकोनातून या प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे.त्यामुळे आता नवीन नेतृत्व उदयास येईल की नाही याची शाश्वतीही आता राहिली नाही. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय दृष्टिकोनातून निर्माण झालेला पेच तातडीने सोडून यवतमाळ जिल्ह्याला एक राजकीय दबदबा निर्माण व्हावा याकरिता लाल दिव्याची अत्यावश्यकता आहे.हा जिल्हा आता पोरका राहूच नये ही मात्र बांधणी राजकीय पातळीवर व्हायला पाहिजे, अन्यथा आदिवासी बहुल आणि मागास जिल्हा म्हणून परत यवतमाळची अधोगतीकडे वाटचाल तर नाही ना हा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.
No comments