रफिक कनोजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दूरदृष्टी निर्माण करीत देशाच्या राजकारणामध्ये उगवता सितारा म्हणून ज्यांचे नाव आजही तेवढ...
रफिक कनोजे
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दूरदृष्टी निर्माण करीत देशाच्या राजकारणामध्ये उगवता सितारा म्हणून ज्यांचे नाव आजही तेवढ्याच मोठ्या स्वाभिमानाने घेतले जाते ते म्हणजे शरद पवार. पुलोद पासून तर एनसीपी पर्यंतचा प्रवास प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. शरद पवार यांची ग्रामीण विभागातील सर्वात मोठी ओळख म्हणजे पवारसाहेब आताही माझ्या नावाने ओळखतात. ही ओळख सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एखादी मोठी पदवी देऊन जाते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती श्रद्धा व नेतृत्व स्वीकारणाऱ्या माणसांनी शरद पवारला आपले श्रद्धास्थान मानले आहे. त्यामुळे या नेतृत्वाबद्दल गावातला प्रत्येक माणूस तेवढाच आदराने बघतो मग तो सत्तेतला असो की, विरोधी गटाचा असो. असे असताना यवतमाळ जिल्ह्याशी शरद पवार यांचं नातं तेवढच कायम राहिला आहे. त्यावेळी असणारे यवतमाळातील कार्यकर्ते आजही शरद पवारांना तेवढ्याच सन्मानाने आपले साहेब म्हणून हाक मारतात, असे असताना देशाच्या 19 व्या क्रमांकावर असणारा व महाराष्ट्रातील मागास वर्ग, आदिवासी बहूल जिल्हा म्हणून परिचित असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळख असणारा तालुका म्हणजे झरीजामणी. या तालुक्यातील आदिवासींची संख्या ही बहुतांशी नव्वद टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे या लोकसंख्येच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारित विशेषत: संविधानाच्या सूचीमध्ये विशेष विकासाची तरतूद केली असली तरी राष्ट्रवादीचे घड्याळ मात्र या तालुक्यात टिकटिक करतांना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या संपर्कात असणाऱ्या व वरिष्ठांकडे कागदावरती मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये इतकं मोठं काम केलं. अशा प्रकारचा वावरणार्यां पुढाऱ्यांनी मात्र आजही झरीजामणी नावाच्या तालुक्याकडे दुर्लक्षच केले.
या तालुक्यातील असणारी समस्या व त्या समस्यांची संख्या न मोजणे एवढी आहे. बहुतांश लोक या ठिकाणी कोलाम पोडावरती राहतात. या पोडावर वास्तव्य करीत असताना आजही त्यांना काय खस्ता खाव्या लागतात हे त्यांचे त्यांनाच माहीत. कर्नाटक मध्ये सर्वात मोठी अघोरी असणारी प्रथा होती आणि ती आजही परंपरागत आहे. ते म्हणजे देवदाशी, दगडांशी लग्न करुन मंदिरामध्ये आपण विवाहित आहोत, म्हणून आयुष्य खर्ची घालणाऱ्या आणि पोटभरू पुजाऱ्यांच्या वासनेच्या शक्तीला बळी गेलेल्या देवदाशींच्या बद्दल थोडा आवाज उठवल्या गेला. प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांनी त्याबद्दल मोठी चिकित्सक समीक्षा केली आहे. असे असताना त्याच वरती झरीजामणी तालुक्यामध्ये कुमारी मातांचा प्रश्न तेवढाच मोठा गंभीर आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडे आला असतानाही यांच्या घरापर्यंत अजून पर्यंत तो निधी पोहोचला नाही. बेवारस असणाऱ्या मुलांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कोरोणाच्या महाभयानक काळामध्ये या जगल्या कश्या याच सुद्धा एक मोठं संशोधन आहे. अशा शेकडो समस्या आहेत. येथील काही गावाने कधी बस पाहिले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व्यवस्थित आहे की नाहीत. कुठल्याही प्रकारचा उद्योग नाही. मोठमोठ्या संस्थांनी पैशाच्या बळावर निर्माण केलेलं कारखान्याचे वलय आदिवासींच्या जीवावर उठले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जमिनीची मालकी असणारे ही भूमिपुत्र आता भूमिहीन होणार हे शंभर टक्के खरे आहे. असे असतानाही शासन प्रशासन याकडे कुठले प्रकारचा लक्ष द्यायला तयार नाही. पुढारी या परिसरामध्ये येतात गावातील भेटी देतात त्यांच्या सोबत फोटो काढतात परंतु त्यापलीकडे कुठल्याही प्रकारचा विकासात्मक धोरण इथे राबवले जात नाही. विद्यमान शासनामध्ये असणारे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावर असणारे भारतीय जनता पार्टी यांना झरीजामणी तालुक्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . अन्यथा 21 व्या शतकाचे स्वप्न बघणारा माणूस कुठे असेल दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांचा वाढदिवस आज आहे. ज्याने महाराष्ट्राला एक वैभवाची परंपरा दिली आहे आणि कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे .त्यामुळे शरद पवारांनाही याबाबत दुःख वाटत असेल. यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी तालुक्यात असणाऱ्या समस्यांकडे माझा कार्यकर्ता अजून पर्यंत का पोहोचला नाही हि खंत मात्र शेवटपर्यंत कायम राहील. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी किमान राष्ट्रवादीचे घड्याळ आता झरी जामणी तालुक्यात दिसेल का आणि विकासाची काटे गतिमान होतील का याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
No comments