यवतमाळ (प्रतिनिधी) संस्था, संघटनांच्या पर्यावरण स्नेहींच्या श्रमदान आणि जलजागृतीपर विवीध उपक्रमांतुन पर्यावरण रक्षणाचा संदेश ...
यवतमाळ
(प्रतिनिधी) संस्था, संघटनांच्या पर्यावरण स्नेहींच्या श्रमदान आणि जलजागृतीपर विवीध उपक्रमांतुन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येत आहे. १३ सप्ताहांपासुन यवतमाळकरांचा हा सेवासंस्कार सुरु असुन याद्वारे उपस्थितांमध्ये जलजाणीव तर परिसरात जनजागृतीला सुरुवात झाली आहे. रविवारी (११ डिसेंबर) झालेल्या श्रमदानामध्ये पर्यावरण संरक्षण गतीविधी, यवतमाळ प्लॉगर, बी काइंड, युनीटी, सावली आदी संस्थांच्या सेवाकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
१३ व्या सप्ताहातील श्रमदानाप्रसंगी आलेल्या संस्था व संघटनांच्या सेवेकऱ्यांनी वाघाडी नदीवर असलेल्या पुलाखालील कचरा संकलीत केला. विशेष करुन यामध्ये प्लास्टीक, नायलॉन, केमिकल, बायोवेस्ट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आदी पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तुंचा समावेश होता. यावेळी नगर परिषदेने पाठवीलेल्या ट्रॉलीमध्ये कचरा सुपुर्द करण्यात आला. देवदेवत्यांच्या मुर्त्या व्यवस्थितपणे ठेवण्यात आल्या. या पीओपी च्या मुर्त्यांचे पुढील आठवड्यात कृत्रिमपणे विघटन करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात मद्यपींनी रिचविलेल्या शंभरावर दारुच्या रिकाम्या बॉटल्सही गोळा करण्यात आल्या. सीडी, मातीचे मडके, दिवे, तडा पडलेल्या कुंड्या, तुटलेल्या शोभेच्या वस्तु आदी टाकाऊ वस्तुंपासुन कलाकुसरिच्या वस्तुनिर्मीतीच्या निमीत्ताने या वस्तु संकलीत करुन स्वच्छ करण्यात आल्या. नदीमध्ये टाकण्यात आलेली फळे आणि पुजा साहित्यातील नारळं गोळा करुन स्वच्छ करुन सुकविल्यानंतर खाण्यायोग्य नारळं व फळे जनावरांसाठी उपयोगी आणली जातात.
या १३ व्या आठवड्यातील श्रमदानामध्ये संस्था, संघटनांचे राहुल दाभाडकर, अभीजीत गुल्हाने, भुषण क्षीरसागर, प्रतिक तराळकर, अश्विन सवालाखे, गुरुबानी कौर सलुजा, यामिनी घरत, देवाशिष गजभिये, कल्याणी मेश्राम, अल्केश अंभोरे, ओम पोटे, सृष्टी कोटवानी, सुरज परसमोडे, मोहीत ढोले आदी पर्यावरण स्नेही सेवारत होते.
*दिवाळीची लक्ष्मी रुसली*
वाघाडी नदीचे पाणी आटते आहे. त्यामुळे पाण्यात विसर्जीत केलेल्या सणसमारंभातील देवतांच्या मुर्त्या उघड्या पडताहेत. दिवाळी आटोपल्यानंतरच्या प्रत्येक श्रमदानाला आतापर्यत ५०० पेक्षा जास्त लक्ष्मीच्या मुर्त्या संकलित करण्यात आल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसने रसायनांमध्ये घडविलेल्या, पुर्वी आकर्षक दिसणाऱ्या मात्र विसर्जनानंतर पर्यावरणास घातक ठरणाऱ्या भंगलेल्या, रंग उडालेल्या, गाळात कुजल्या अवस्थेतील मुर्त्या जणु रुसल्याप्रमाणे भासत होत्या.
*‘चला जाणुया नदी’साठी पाठपुरावा*
राज्य शासनाच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागातर्फे राज्यात २ ऑक्टोबरपासुन ‘चला जाणुया नदीला’ हा जलजागृती करणारा पर्यावरणपुरक उपक्रम वर्धेतुन सुरु करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने यामध्ये राज्यातील ७५ नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. जागृत संस्था, संघटना, नागरिकांच्या मागणीमुळे या नद्यांची संख्या वाढली असुन यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील संदर्भ असलेल्या वाघाडी नदीचाही समावेश करण्यात यावा याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. याकरिता पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत संस्था, संघटनांच्या पर्यावरण स्नेहींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारेही या मागणीकरिता साद घातली आहे.
---------------
*परिक्रमा तथा स्नेहमिलन*
यवतमाळकर संस्था, संघटनांच्या पर्यावरण स्नेहींनी १३ आठवड्यापासुन चालविलेल्या स्वच्छ व सुंदर नदी अभियानातील ‘वाघाडी’ जाणुन घेण्यासाठी परिक्रमा केली. वळणरस्त्यापर्यतच्या वाघाडी नदीच्या पात्रातुन पदयात्रा काढत या भागांमध्ये अपेक्षीत जलसंवर्धनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच जनसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने वाघाडीजवळील गावांत दिवाळीनिमीत्त ग्रामस्थांसोबत स्नेहमिलन सोहळा आयोजीत करुन त्यांना कपडे व फराळ प्रदान करुन त्यांचेशी संवादातुन एकोपा वाढवीण्यात आला.
No comments