जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी... मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली... घन ओथंबून येती ...
जांभूळ पिकल्या
झाडाखाली ढोल
कुणाचा वाजं जी...
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची
बाई लाज टाकली...
घन ओथंबून येती
बनांत राघू ओगिरती
पंखावरती सर ओंघळती
झाडांतून झडझडती...
मन ओथंबून येती...
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल...
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे...
आदी अजरामर गाणी आणि कविता आपल्याला देणारे शेती-मातीतला आणि रानातील कवी अशी ओळख असलेले गीतकार पद्मश्री नामदेव धोंडो ऊर्फ ना. धों. महानोर दादा यांचे पळासखेड (जि. छत्रपती संभाजीनगर) हे जन्मगाव. खानदेशच्या जळगाव जिल्ह्याला लागूनच अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेले अगदी पाचसातशे लोकसंख्येचं हे पळासखेड. मात्र, शालेय शिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे व त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी जळगावला आलेले महानोर दादा हे धरणगावचे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी, खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्यासह खानदेशातील आदी प्रतिभावंतांनंतर त्यांच्या काव्यसंपदेमुळे महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचक व काव्यरसिकांचे आवडते कवी केव्हा झाले, हे कळलंच नाही.
जळगावला १९९८ ते २०११ या कालावधीत पत्रकारिता करताना महानोर दादांना अनेक कार्यक्रमांत प्रत्यक्ष पाहता आलं, बोलता आलं आणि बोलकं करताही आलं. मला अजूनही आठवतं १९९८ किंवा १९९९ साल असावे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रर्मिला भिरूड मॕडम यांनी लिहिलेल्या 'बहिणाईंची गाणी : एक अभ्यास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महानोर दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावला जुन्या नशिराबाद रोडवरील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात सायंकाळी आयोजित केला होता. या समारंभाला प्रमुख पाहुणे महानोर दादा व आम्ही काही पत्रकार मंडळी वेळेवर पोहोचलो होतो. मात्र, कार्यक्रम सुरू व्हायला उशीर होणार होता. म्हणून दादा आम्हा काही पत्रकारांशी गप्पागोष्टी करायला लागले. यावेळी मी पहिल्यांदाच दादांना प्रत्यक्ष पाहिले व भेटलो होतो. त्यांनीही इतरांप्रमाणे माझीही चौकशी केली. गाव कोणतं, शिक्षण आणि विषय कोणता होता आदींबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतरही बऱ्याचदा दादांशी प्रतिक्रिया घेण्यासाठी फोनवर बोललो, अनेक कार्यक्रमांत दादांना पाहिले आणि त्यांना ऐकून वाचकांपर्यंत पोहोचवले.
आपल्या दैनिक 'सकाळ'च्या खानदेश आवृत्तीच्या जळगाव येथे झालेल्या वर्धापनदिन सोहळ्यानंतर गेल्याच वर्षी जळगाव येथे दादांची झालेली धावती भेट ही शेवटचीच ठरली. कारण जगभरातील असंख्य मराठी काव्यरसिकांना आपल्या काव्यप्रतिभेने शेती-मातीशी नातं जोडत निसर्गाच्या सान्निध्यात मुसाफिरी करण्याचं वेड लावणारं पळासखेडचं हे वेल्हाळ पाखरू गुरुवारी (तीन अॉगस्ट २०२३) सकाळी आपल्या सर्वांच्या दृष्टीआड गेलं ते कधीही परत न येण्यासाठी. 'गुंतलेले प्राण या रानात माझे' या त्यांच्या काव्यओळींप्रमाणे शेतातच रमणाऱ्या या रानकवीला भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
(दादांसोबतचे हे छायाचित्र गेल्या वर्षी जळगावला झालेल्या शेवटच्या भेटीचं आहे.)
-रवींद्र शिंदे
No comments