पब्लिक पोस्ट ब्युरो मुंबई बदलापुरच्या आदर्श विद्यालयातील ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीने ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहे...
पब्लिक पोस्ट ब्युरो
मुंबई
बदलापुरच्या आदर्श विद्यालयातील ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीने ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत… म्हटल्यावर आईने दवाखान्यात नेले. तेव्हा कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या इसमाने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचे बळी बनवले. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना व्हायरल होताच संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेलरोको केला आणि आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने या प्रकरणाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवले आहे.
आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याचे वय 24 वर्षे आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे 14 ऑगस्ट रोजी उजेडात आले. यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. असा आरोप येथील पालकवर्गाने केला आहे.
ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आले पाहिजे. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्यात येणार. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा झाली असून सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही दिले आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मला वाटतं की आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी (लाडली बहन) योजना राबवतोच पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे, देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या, तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.. दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडले होते. त्या आरोपीला फासावर लटकवायला इतका वेळ लागला. अशा प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेला विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. हातरस, उन्नाव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. आमचे सरकार गद्दारांनी पाडले म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक मांडून या आरोपींना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचे मला समजले. यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे, पुणे हिट अँड रन आरोपी मिहीर शाह अटकेत आहे. त्यांनी पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या नराधमाला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणं गायब होणं परवडणारं नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की, आपल्या लाडकी बहन आणि मुलींबद्दल आपल्याला आदर आहे.- उद्धव ठाकरे
•शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
•पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
•संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश.
•संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले.
•सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देश दिले आहे.
•कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
•जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.
•घडलेल्या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश
•एसआयटीची नियुक्ती
•बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या निलंबनाचे आदेश....
•आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होणारच
•हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाणार....
•उज्ज्वल निकम हा खटला चालवणार (कल्याणमधील पुजाऱ्यांनी केलेल्या बलात्कार प्रकरणी देखील उज्ज्वल निकमच केस चालवत आहेत)
•गुन्हा दाखल करून घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल संबंधितांची तात्काळ चौकशी करावी
•हे सर्व अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश....
घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रस्ताव आजच दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत
बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती करुन देखील आंदोलक माघार घेण्यास तयार होत नव्हते. आंदोलकांनी जवळपास 9 तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. अखेर पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. यावर आंदोलकांकडून दगडफेक झाली. पण पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत गर्दीला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला सध्या छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक रेल्वे रुळाच्या बाहेरच्या दिशेला निघाले. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक रिकामं करण्यात पोलिसांना यश आलं.
No comments