यवतमाळ प्रतिनिधि "विमुक्त भटके, आदिवासी संवाद यात्रा" पुणे-सोलापूर, सोलापूर ते नागपूर, नागपूर ते मुंबई या मार्गाने न...
यवतमाळ
प्रतिनिधि
"विमुक्त भटके, आदिवासी संवाद यात्रा" पुणे-सोलापूर, सोलापूर ते नागपूर, नागपूर ते मुंबई या मार्गाने निघणारी विमुक्त-भटके, आदिवासी यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकाराची मागणी करणारी, 'सांगा धनाचा साठा नी, अमुचा वाटा कुठं हाय वो' म्हणत राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला खडा सवाल करण्यासाठी, आपल्या भटक्या समूहाला एक संघ व एक जुट करण्यासाठीची संवाद यात्रा येत्या ३१ ऑगस्ट विमुक्त भटके दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र भर दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत निघणार आहे. या संवाद यात्रेचे विदर्भ स्तरावर नियोजन करण्यासाठी आज दिनांक २५ ऑगस्ट २०२४ यवतमाळ मधील वाघाडी येथे पारधी फासे पारधी संस्थेच्या मुलींचे वसतिगृह कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या विमुक्त भटक्या समूहाच्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भटक्या विमुक्त, आदिवासी समूहाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि संघटनांची "विमुक्त भटके, आदिवासी संयोजन समिती" महाराष्ट्र भर काम करीत आहे. विमुक्त भटके, आदिवासी संयोजक समिती महाराष्ट्र कडून राज्यामध्ये *भटक्या विमुक्त, आदिवासी संवाद यात्रेची* घोषणा येत्या २८ ऑगस्ट २०२४ ला फुले वाडा, पुणे येथे केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या विभागीय स्तरावर बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. याच धर्तीवर आजची बैठक पार पडली आहे. या बैठकीला विदर्भ संयोजन समितीचे विभागीय प्रमुख तथा महाराष्ट्र संयोजन समिती सदस्य बाबूसिंगजी पवार, समर्थ बहुउद्देशी संस्था अमरावती यांची प्रमुख उपस्थिती होती तर सोबतच विदर्भ संयोजन समितीचे विजय पचारे, माध्यम साक्षरता संस्था वर्धा, कोरो इंडिया संघटना, मुंबई या संस्थेच्या विभागीय समन्वयक राणीताई येडस्कर आणि अनिता धुर्वे यवतमाळ, आदिवासी संयोजन समिती सदस्य पपिता व इशुजी माळवे पारधी फासे पारधी विकास बहुउद्देशी संस्था, मुलींचे वसतिगृह, वाघाडी, यवतमाळ, मधुसूदन कोवे गुरुजी, ग्राम स्वराज्य महामंच, राळेगाव, प्रा. अंकुश वाकडे, समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळ, गोविंदजी चव्हाण, कृष्णाजी भोंगाडे, विदर्भ राज्य आंदोलन समिती, यवतमाळ, रमेश अटकर, नाभिक संघटना, यवतमाळ, पिंटू देवतळे, दासा संस्था घाटंजी, सोनाली मरगडे, संकल्प बहुउद्देशी शिक्षण संस्था, यवतमाळ. इत्यादी विदर्भातील भटके विमुक्त, आदिवासी संयोजन समितीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*भटके विमुक्त, आदिवासी महाराष्ट्र संयोजन समितीच्या प्रमुख मागण्या*
*१)* भटके विमुक्त जनगणना व भटके विमुक्त आरक्षणाची स्पष्ट भूमिका.
*२)* स्वतंत्र मंत्रालय, मंत्री आणि स्वतंत्र बजेट व त्याचा कायदा.
*३)* देश पातळीवर NTDNT ची रचना, संसद आणि विधान सभेमध्ये प्रतिनिधित्व.
*४)* बार्टी च्या धर्तीवर (वानार्टी) स्वतंत्र संस्था आणि समाज कल्याण विभागामार्फत वसतिगृहे.
*५)* विमुक्त भटके, आदिवासी यांचा स्वतंत्र अभ्यास व संशोधन गट किंवा आयोग निर्माण करावा.
*६)* राज्यसभा व विधान परिषद खासदार, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत आणि नगर पंचायत मध्ये राजकिय आरक्षण.
इत्यादी मागण्या आणि महाराष्ट्रातून भटक्या समूहाच्या प्रश्नांचे गाठोडे हे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाच्या स्वरूपात देऊन त्यांचे मार्फत राज्य सरकारला पाठवण्याचे नियोजन आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२४ रोजी ही यात्रा नांदेड मार्गाने येणार असून सुरुवातीला विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
११ सप्टेंबर २०२४ ला या यात्रेच्या भव्य स्वागताची जबाबदारी यवतमाळ संयोजन समितीने सामूहिक पणे आजच्या बैठकीत स्वीकारली आहे. सोबतच यवतमाळ शहरातील बिरसा मुंडा चौक ते संविधान चौक आणि संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पायदळ यात्रा करण्याचे नियोजन आखले जाणार आहे. 'ही यात्रा' कुठल्याही राजकीय पक्षांसी संबंधित नसून आदिवासी, भटक्या समूहाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मूलभूत हक्कासाठी व संविधानामध्ये असणाऱ्या तरतुच्या न्यायासाठी आणि आपला स्वाभिमान व आत्मसन्मान जागा करण्यासाठी काढली जाणार आहे. असे मत यावेळी बोलताना महाराष्ट्र संयोजन समितीचे बाबूसिंग पवार यांनी व्यक्त केले. या यात्रेच्या अनुषंगाने संवाद यात्रेची पुढील दिशा आणि महाराष्ट्र भर या यात्रेचे स्वरूप विजय पचारे यांनी मांडले. या बैठकीत आवर्जून सहभागी झालेल्या विविध संस्था-संघटना प्रमुखांनी या यात्रेच्या विचाराचे स्वागत केले, या यात्रेचे समर्थन केले व तन, मन, धनाने यात्रे मध्ये सहभागी होण्याचे आश्वासनही दिले.
बैठकीचा समारोप यवतमाळ संयोजन समितीचे अरविंद बोरकर यांनी करतांना उपस्थितांचे आभार मानून या संवाद यात्रेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील भोई समाज, पारधी समाज, कोलाम समाज, गोंड समाज, बंजारा समाज, बेलदार समाज, मदारी समाज, मांगगारोडी समाज, लोहार समाज, बहुरूपी समाज, नाथ जोगी समाज, वंजारी समाज, धनगर समाज, सरोदी समाज, गोंधळी समाज, वडार समाज, नाभिक समाज, इत्यादी समाज संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते आणि इतर संस्था संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते आप आपल्या वेशभूषे मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे, असे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. बैठकीचे आयोजन इशुजी साळवी यांनी वाघाडी येथील आपल्या पारधी फासे पारधी संस्थेच्या मुलींचे वसतिगृह या कार्यालयात केले. तर या बैठकीला इतर संस्था संघटना यांनी सहभागी होण्यासाठी कोरो इंडिया चे प्रतिनिधी व विदर्भ संयोजन समिती प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.
No comments